Tuesday, February 26, 2019

आई

प्रिय आईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

आई! तू आहेस एक झरा
उत्साहाने खळखळणारा,
सर्वांना सामावून घेत
स्वतःचे अस्तित्व जपणारा..

जीवनप्रवास तुझा बघून
स्फूर्ती आम्हाला मिळते,
घरासाठी झिजण काय असतं
ते तुज्याकडे बघून कळते.

पैशाच्या श्रीमंतीपेक्षा तू
नेहमीच जपलस माणुसकीला,
मानपान सगळ्यांचे सांभाळत
बांधून ठेवलस सगळ्या परिवाराला.

न डगमगता संकटांशी लढण्याचा
घालून दिलास आदर्शपाठ,
देऊन संस्कारांची शिदोरी
सुकर केलीस आमची जीवनवाट

सांभाळताना संसाराचा व्याप
कदाचित राहिल्या असतील काही इच्छा,
पूर्ण होवोत तुझ्या सर्व मनोकामना
हीच तुझ्या वाढदिवसाच्या सदिच्छा!

               सौ. वैष्णवी वि. राऊत
                  

बाहुली-बालगीत

विषय - बाहुली (बालगीत)

बाहुली माझी छान छान
रंग तिचा गोरापान
घारे डोळे मिचकावुनी
इकडून तिकडे हलवी मान

नाचते छान तालावर
खळ्या पडती गालावर
राग तिच्या नाकावर
रुसून बसते माझ्यावर

माझ्यासंगे गप्पा मारी
सोबत हिंडे दुनिया सारी
नटण्याची तिला हौसही भारी
बाहुली माझी सुंदर परी

बाहुली नव्हे मैत्रीण माझी
खेळ खेळतो गमतीचे
आईबाबा पुसती मला
गुपित आमच्या जमतीचे

बाहुली माझी गोड-गोजिरी
मस्तीखोर तरी आहे लाजरी
शालू नेसून भारी भरजरी
नवरी आमची दिसे साजिरी

                सौ. वैष्णवी विकास राऊत.
                मुंबई.

शब्द

शब्द

भाषा एक माध्यम
व्यक्त होण्याचं
शब्द देतात सामर्थ्य
भावना प्रकट करण्याचं

शब्दच ठरतात आधार
हळव्या दुखऱ्या मनासाठी
शब्दच ठरतात पाठीवरील थाप
नव्याने आभाळात भरारण्यासाठी

काही शब्द अलगद हळुवार
काही शब्द जळजळीत विखार
काही शब्द तलम अलवार
काही शब्द झगझगीत निखार

शब्द साधतात संवाद
कधी वाद तर कधी वितंडवाद
शब्द असतात एक शस्त्र
माणस जोडण्याचं प्रभावी अस्त्र

म्हणूनच घेऊन शब्दांची सोबत
करूया सर्व अडचणींवर मात
समजावून घेऊ एकमेकांना
राहू या सर्व आनंदात.

                      सौ. वैष्णवी विकास राऊत.

कविता1

प्रेम, आपुलकी , विश्वास
केवळ शब्द नव्हे पुस्तकातले
इमारत नात्यांची तोलती
इंद्रधनू फुलविती जीवनातले